फरार रितीकला दोन पिस्टलांसह अटक

वर्धा/प्रतिनिधी शहरातील स्टेशनफैल परिसरात झालेल्या दोन गटांमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी तसेच सराईत गुन्हेगार रितीक तोडसाम, रा. इतवारा बाजार, वर्धा यास मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल तसेच एक जिवंत काडतूस जप्त केली. काही दिवसांपूर्वी स्टेशनफैल परिसरात दोन गटात झालेल्या वादात गोळीबार झाला होता. यातील सात आरोपींवर मोका लावण्यात आला आहे.

दरम्यान, याच गटातील काही आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेत असताना गोळीबार प्रकरणातील फरार रितीक तोडसाम रा. इतवारा बाजार हा कोणतातरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी विसावा चौकात सापळा रचून मोठ्या शिताफीने रितीकला ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीची दोन पिस्टल आणि एक काडतूस आढळून आली. त्याला तत्काळ अटक करून त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीच्या दोन पिस्टल, १५०० रुपये किमतीचं काडतुस, ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच इतर वस्तू असा ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक आर. बी. खोत, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, नितीन इटकरे, पवन पन्नासे आदींनी केली.