अन्नदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी किसानपुत्रांचा एकदिवसीय अन्नत्याग

वर्धा/प्रतिनिधी स्मृतिशेष शेतकरी साहेबराव करपे व मालती करपे यांच्या राज्यातील पहिल्या सहकुटुंब आत्महत्येच्या स्मृतीदिनी रविवार १९ रोजी स्थानिक महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी किसानपुत्रांच्या वतीने एकदिवसीय वैयक्तिक अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. १९ मार्च १९८६ मध्ये साहेबराव करपे यांनी पत्नीसह आत्महत्या केली होती. याची दखल घेतलेली पहिली शेतकर्यांची सहकुटुंब आत्महत्या होती. तेव्हापासून सुरू झालेला शेतकरी आत्महत्येचे प्रमाण आजही थांबलेले नाही.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. सरकारे बदलली पण धोरण बदलले नाही. त्याच जाचक कायद्यांच्या बेड्यात शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. यासोबतच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना विविध सामाजिक संघटनांनी सहभाग दर्शवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी स्वतंत्र औद्योगिक अस्थायी कामगार संघटना, आत्मनिर्भर बहु. सामाजिक संस्था, आसमंत युवा बहु. संस्था, भीम आर्मी संविधान रक्षक दल, अध्यक्ष द विंग्स फाउंडेशन, सृजन साहित्य संघ, किरण बहु. सेवा संस्था, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग गुरुकुंज आश्रम वर्धा, श्री गुरुदेव सेवा मंडळ, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, संघर्ष करिअर ॲकॅडमी, वर्धा कला मंच, ओबीसी महासंघ, कुणबी महासंघ, लायन्स क्लब गांधी सिटी, शिवा संघटना, दक्ष फाउंडेशन आदी संघटनांनी यात सहभाग नोंदविला होता.