विशेष शिबिरे घेऊन नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथीयांची नावे मतदार यादीत नोंदवा- डॉ. श्रीकांत देशपांडे

वर्धा/प्रतिनिधी आगामी २०२४ या वर्षात होणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक विषयक विविध बाबींचा आढावा घेतला. पात्र ठरत असलेल्या प्रत्येक नवमतदारांसह दिव्यांग, तृतीयपंथीयांची नावे यादीत नोंदविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. विकास भवन येथे ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक प्रविण महिरे उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ संदर्भातील निवडणूक पूर्वतयारी बाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. मतदार यादीचे शुद्धीकरण, मतदार यादीमध्ये असलेले मयत किंवा मृत्यू पावलेल्या, दुबार, अवशिष्ट, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन नाव कमी करणे, ब्लर फोटो बाबतमतदारांकडून व्यवस्थित स्पष्टछायाचित्र प्राप्त करून घेणे, ८० वर्षांवरील सर्व मतदारांची तपासणीकरून त्यामध्ये मृत्यू, स्थलांतरीत,विवाहित महिला मतदारांचा शोध घेऊन त्यावर आवश्यकतेनुसारनमुना ७, नमुना ८ भरून घेऊन मतदार यादी शुद्धीकरण करणेयाबाबत डॅा.देशपांडे यांनी सुचना केल्या. नव मतदार, तृतीयपंथी मतदार, महिला मतदार, विशेषआदिवासी वस्त्यातील मतदार, भटके मतदार, दिव्यांग व्यक्ती यांची
मतदार नोंदणी करण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येऊन मतदार संख्या वाढवणे, मतदार नोंदणी करीता विशेषत: १८ ते १९ वयोगटातील मतदारांना लक्ष करून त्यांची संख्या वाढवणे तसेच १७ वर्षावरील सर्व विद्यार्थी व महाविद्यालयीन मुलांच्या याद्या संबंधित शाळा, महाविद्यालयांकडून संकलित करून त्याबाबत मतदार नोंदणी झाली आहे किंवा नाही याची खात्री करणे, दिव्यांग मतदाराची नोंदणी करून दिव्यांग मतदाराची मार्किंग करणे याकरता जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे दिव्यांग नोंदणीच्या याद्या प्राप्त करून त्यानुसार संबंधिताची मतदार नोंदणी झाली आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नव्याने मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला मतदान ओळखपत्र मिळणे आवश्यक आहे.
ओळखपत्र मिळाल्याची खात्री करावे, अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेला मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार विनोद थोरवे, निवडणूक विभागाचे लिपीक, ऑपरेटर व निवडक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनासोबतच क्षेत्रीय पातळीवरील अडचणी जाणून घेतल्या.तसेच आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील व विधानसभा स्तरावरील मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यासाठी उपलब्ध जागा, गोडाऊन व वेअर हाऊस याबाबतची देखील माहिती घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या.