पंकज ढाकुलकर ठरला आमदार श्री चा मानकरी

वर्धा/प्रतिनिधी खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सावातंर्गत युवा एकता मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धे त पंकज ढाकुलकर आमदार श्री चा मानकरी ठरला तर बेस्ट पोझर संतोष वाघ व बेस्ट मस्कुल्यर मॅन अजय मोहिते ठरला. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्पर्धे चे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट होते तर स्वागताध्यक्ष आ. डॉ. पंकज भोयर, नप चे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, भाजपा वर्धा विधानसभा प्रमुख आशिष कुचेवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक, पिपरीचे माजी सरपंच अजय गौळकार, राजू मडावी आदी उपस्थित होते. स्पर्धा पाच वजन गटात घेण्यात आली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहास माजी मंत्री परिणय फुके, प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक नुरूल हसन, सुधीर दिवे व मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री चा मानकरी पंकज ढाकुलकर याला ५१ हजार रुपये रोख, चषक व गदा देण्यात आली तर बेस्ट पोझर संतोष वाघ ला २१ हजार रुपयांचे पारितोषिक व बेस्ट मस्कुल्यर मॅन अजय मोहिते याला ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत ५७ स्पर्धेक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून अभिषेक करींगवार, दिनेश चावरे, डॉ. योगेश देवतळे, ॲड. विशाल मरडवार यांनी काम पाहिले. ५० ते ६० किलो वजनगट मध्ये राहुल बनसोड, ६० ते ६५ मध्ये अमर ठाकरे, वजनगट ६५ ते ७० मध्ये अजय मोहिते, वजनगट ७०-७५ किलो मध्ये पंकज ढाकुलकर व ७५ व त्यावरील गटात संतोष वाघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. याप्रसंगी खा. तडस म्हणाले की, माणसाचे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आयुष्यात व्यायामाला महत्त्व द्या, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी परिणय फुके यांनी आज खेळाकडे युवकांचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत चिंता व्यक्त करून युवकांनी व्यायाम व खेळाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले.
स्वागताध्यक्ष आ. डॉ. पंकज भोयर म्हणाले क्रीडा संगठनांनी खेळाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजचे आहे. खेळामुळे आरोग्य निरोगी असते. निरोगी शरीर प्रत्येक संकटाचा सामना करू शकते. दगदगीच्या जिवनामुळे प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते तथापि, युवा पीढीने नियमित व्यायाम व्दारे सशक्त व सदृढ शरीर ठेवून राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी खेळ व व्यायामाचे माणसाच्या जिवनात किती महत्त्व असते यावर प्रकाश टाकला. यशस्वितेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मदन इंगळे, सदस्य विपीन पिसे, अश्विन साहू, राजू मडावी, निलेश किटे, निलेश गावंडे, अजय वरटकर, सचिन होले, रवी काकडे, आशिष काळमेघ, आदींनी परिश्रम घेतले.