राज्यात पहिल्यांदा पाच महिला करणार लालपरीचे सारथ्य

वर्धा/प्रतिनिधी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच लालपरीचे स्टिअरिंर्ग महिलांच्या हाती येणार आहे. जिल्ह्यातील पाच महिला लवकरच लालपरीचे सारथ्य करणार आहेत. त्या विविध विभागात चालक म्हणून आपल्या कामकाजास सुरुवात करणार आहेत. लालपरी हा राज्यातल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लालपरीची सुरुवात झाल्यापासून गरजेप्रमाणे एसटी बसमध्ये अनेक बदल होत गेले. आता असाच एक बदल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. सन २०१९ मध्ये पहिल्यांदा महिला चालक अशा पदाची जाहिरात देण्यात आली होती. राज्यातील २१ विभागात सुमारे ६००वर महिला चालकांचे अर्ज प्राप्त झाले होते. वर्धा जिल्ह्यात एसटी महामंडळाकडे चालक पदासाठी १० अर्ज दाखल झाले होते. मात्र, एक नागपूर येथे नोकरीला लागली. दोन महिला प्रशिक्षण सोडून गेल्या, तर दोन महिलांना इतरत्र नोकरी लागली. आता पाच महिलांना चालक प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंर्ग येणार असल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच महिलांच्या हाती कमान एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंर्ग येणार आहे. शरीरावर खाकी, हातात स्टिअरिंर्ग आणि चेहऱ्यावर अभिमानाची भावना घेऊन बस चालविणाऱ्या महिलांची सर्वत्र चर्चा होत आहे.