एमगिरीला जागतिक दर्जाचे करण्याची संधी- नवनियुक्त संचालक डॉ. अशुतोष मुरकुटे

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण भागातील रोजगार ही समस्या डोळ्यापुढे ठेवत महात्मा गांधी यांनी वर्धेत ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्याच ठिकाणी १९३५ मध्ये ग्रामोद्योग सेवा संघाची स्थापना केली. सरकारी पातळीहून आयआयटी सारख्या प्रख्यात संस्थेकडे या संस्थेच्या प्रगतीची जबाबदारी दिली. परंतु, येथील अपुरे मनुष्य बळ, शासनासोबत अपेक्षित समन्वयाचा अभाव या गोष्टींनी येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थानचा विकास अपेक्षित प्रमाणात होऊ शकला नाही. आपल्याकडेही जादूची कांडी नाही. परंतु, केंद्र सरकार आणि स्थानिकांकडून योग्य ते सहकार्य मिळाल्यास वर्ध्यातील एमगिरीमध्ये जागतिक दर्जाची काम करण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यासाठी आपण नियोजन करीत असल्याची माहिती एमगिरीचे नवनियुक्त संचालक डॉ. अशुतोष मुरकुटे यांनी दिली. एमगिरीच्या माध्यमातून बरेच काही करण्यासारखे आहे. या संस्थानची निर्मिती झाल्यापासुन येथे ६ विभागातून संशोेधानाचे काम होते आहे.
या विभागाकडे त्या दृष्टीने लक्ष्य दिल्या गेले नाही. परिणामी, येथील संशोधनाचे काम वाढून किमान १२ विभागापर्यंत पोहोचू शकले असते. परंतु, अपुरे मनुष्यबळही त्याला कारणीभूत आहे. केंद्र सरकारने ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी यासाठी आयआयटीकडे काम दिले होते. मात्र, समन्वयाच्या अभावाने आयआयटी, केव्हीआयसीसोबत संलग्न होऊनही उंची वाढू शकली नाही. आयआयटीमार्फत प्रशासकीय दृष्ट्या आवश्यक असलेले मनुष्यबळ म्हणून २६ जागांसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याची पुर्तता झालेली नाही. येथील वैज्ञानिक, तंत्रज्ञ यांच्या मार्फत कामं केले जात आहेत. येथे पुरेसे मनुष्यबळ दिल्यास ६ विभागाचे २४ विभाग होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार येथे सुविधा देण्यासाठी तयार होती आणि आजही आहे. आपण स्वत: त्याकडे लक्ष्य देऊन ते पुर्णत्वास देण्याकडे आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. देशातील काही औद्योगिकरण संस्थांमध्ये या संस्थांची वेगळी ओळख आहे. येथील संशोधकांचे १० वर्षात १२-१३ पेटेंन्ट फाईल झाले. ३-४ पेटेन्टला मान्यताही मिळाली, ही फारमोठी उपलब्धी आहे. येथील पंचगव्यावर वैज्ञानिकदृष्ट्या होणारे काम फार मोठे आहे.
हाताने चालवल्या जाणारा चरखा सोलरपर्यंत पोहोचवण्यात एमगिरीला यश मिळाले आहे. येथील कामांचा प्रवाह थांबला होता. आता त्यात पुन्हा जोश भरण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. संस्थांनचे काम वाढवायचे असेल. उद्योजकांना अपेक्षित तंत्रज्ञान देऊन रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यायचे असेल तर त्यासाठी येथील ४ एकर ही जागा कामाची नाही. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांनी जागेसंदर्भात आपल्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थानच्या प्रगतीसाठी आपल्याला योग्य ते सहकार्य मिळत गेल्यास एमगिरी जागतिक दर्जाची संस्था होण्यास फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असेही डॉ. मुरकुटे यांनी सांगितले.