सावंगी मेघे रुग्णालयातील जटिल शस्त्रक्रिया रक्तगट भिन्न तरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण

वर्धा/प्रतिनिधी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात गरजू रुग्ण आणि किडनीदात्री आई या दोघांचेही रक्तगट वेगवेगळे असताना किडनी म्हणजेच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. एटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम असलेल्या २९ वर्षीय रुग्णाला सावंगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी भरती करण्यात आले होते. जन्मदात्या आईने किडनी दान करण्यास सहमती दर्शविली. मात्र, शस्त्रक्रियापूर्व तपासणी केली असता आई आणि मुलाचे रक्तगट वेगवेगळे असल्याचे आढळून आले. याला वैद्यकीय परिभाषेत एबीओ इनकॉम्पॅटिबल असे संबोधले जाते. अशा परिस्थितीतही शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केल्यावर क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची परवानगी घेण्यात आली. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या दोन आठवड्यांपूर्वी आवश्यक औषधी शरीरात सोडण्यात आल्या, तसेच रक्ताचे शुद्धीकरण व रक्त बदलविण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या एबीओ इनकॉम्पॅटिबल प्रत्यारोपण प्रक्रियेत सावंगी रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते, डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धर्माशी, डॉ. शिवचरण बालगे, डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. ऋतुराज पेडणेकर तसेच नेफ्रोलॉजिस्ट डॉ. मनीष बलवानी, डॉ. अमित पसारी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. शिवम दुबे, डॉ. प्रांजल काशीब हे शल्यचिकित्सक तसेच बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. संज्योत निनावे, डॉ. नीता वर्मा, डॉ. जुही जाधव, डॉ. शीतल मडावी आणि सहकारी चमूचा सहभाग होता. रुग्ण आणि किडनीदाता ह्यांची प्रकृती पूर्ववत झाल्यावर दोघांनाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ही जटिल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याबाबत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य सल्लागार सागर मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, अहमिंद्र जैन, आदित्य भार्गव, अर्चना साखरकर, प्रियांका चिमोटे, मृणाल बांबोडे यांनी विविध पातळ्यांवर महत्त्वपूर्ण सहकार्य केले.