लवकरच पोहरागडावर रेल्वे लाईन येणार; फडणवीसांची मोठी घोषणा

वाशिम/प्रतिनिधी संतश्री सेवालाल महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरागडावर दाखल झाले होते. यावेळी फडणवीसांनी बंजारा समाजासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये रेल्वेलाईन बाबत फडणवीसांनी बंजारा समाजाला आश्वासन दिलं आहे. वर्धा-नांदेड रेल्वे रूट पोहरागडावरून गेला पाहिजे. ही मागणी मोदीजींनी मान्य केली होती. त्यासाठी या बजेटमध्ये मोदीजींनी पोहरागड रेल्वे रुटसाठी ५०० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे लवकरच पोहरागडमध्ये रेल्वेलाईन येईल. फडणवीस पुढं म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या वतीने अडीचशे कोटी रुपयांचा रस्ता आपण तयार करत आहोत. ज्यामुळे भक्तांना त्रास सहन करावा लागणार नाही. मोदीजींच्या सरकारने बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांकरता एक नवीन महामंडळ सुरू केलं आहे. त्यामुळे बंजारा समाजाचा विकास होणार आहे. त्याचवेळी आपण मागणी केली की, महाराष्ट्र सरकारने देखील महामंडळाला अधिकचा निधी द्यायला हवा. त्याची काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. ही तिजोरी महामंडळासाठी रिकामी करण्याचं काम आपण करू, असंही फडणवीस यांनी नमूद केलं. बंजारा समाज ही आपली संस्कृती आहे. बंजारा समाजाची गोर बोली आहे. यासाठी मागच्या काळात आपल्याला अकॅडमी सुरू करायची होती. मात्र आपलं सरकार गेलं होतं. आता आपलं सरकार आलं आहे. या गोर बोलीचं संवर्धन करण्याचं काम आपलं सरकार नक्की करेल, असंही फडणवीस म्हणाले.