संगीतानुभवाला रसिकांची दाद

वर्धेकर गायकांनी बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, कीर्ती शिलेदार, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेल्या रसिकप्रिय नाट्यगीतांचे सादरीकरण करीत विविध पात्रे रंगभूमीवर जिवंत केली. कार्यक्रमाची सुरुवात परंपरागत नांदीने झाली. प्रारंभी ऋषीच्या वेशातील कवी नेसन यांनी ययाती देवयानी या नाटकातील सर्वात्मका सर्वेश्वरा हे नाट्यगीत सुरेल स्वरात सादर केले. कट्यार काळजात घुसली या नाटकातील खांसाहेबांच्या वेशात प्रा. विकास काळे यांनी या भवनातील गीत पुराणे हे नाट्यपद तर पंडितजींच्या वेशातील नितीन वाघ यांनी घेई छंद मकरंद हे गीत साभिनय सादर केले. यासोबतच, सुभद्रेच्या वेशभूषेत भैरवी काळे मोहदुरे हिने संगीत सौभद्रमधील वद जाऊ कुणाला शरण हे नाट्यगीत सादर करून दाद मिळविली. रुक्मिणीच्या वेशभूषेत खुशबू कठाणे यांनी संगीत स्वयंवर नाटकातील मम आत्मा गमला हे गीत तर केतकी कुलकर्णी यांनी नरवर कृष्णासमान हे नाट्यगीत सादर करीत या अभिनव कार्यक्रमाची रंगत वाढविली. पूजा कावरे यांनी सोहम हर डमरू बाजे हे संगीत मंदारमाला नाटकातील गीत सादर केले. सूत्रधाराच्या भूमिकेतील अतुल रासपायले प्रत्येक नाट्यपदाची पार्श्वभूमी मांडत आणि विविध प्रसंगांना एका सूत्रात गुंफत नाटकाचे कथानक रसिकांच्या दृष्टीसमोर प्रत्यक्ष उभे केले. कार्यक्रमाची सांगता भरतवाक्य या भैरवीने करण्यात आली. या कार्यक्रमात श्याम सरोदे, मंगेश परसोडकर व अनिल दाउतखानी यांनी तबल्याची तर नरेंद्र माहुलकर यांनी संवादिनीची साथ केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रूपाली सरोदे यांनी केले. विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी आभार मानले. या साभिनय नाट्य संगीतानुभव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगभूषाकार मनीष खडतकर, वेशभूषाकार अभिजीत पळसापुरे, ध्वनिसंयोजक प्रशांत कोल्हे, सांस्कृतिक समिती प्रमुख संगीता इंगळे, रंजना दाते, आरती मोकलकर, सीमा मुळे, कविता वलोकर, रेणुका दाते, डॉ. माधुरी काळे, पल्लवी पुरोहित यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.