आरोग्य सुविधा सुसज्ज करण्याकरीता प्रयत्न करु-

आ.डॉ. पंकज भोयर वर्धा/प्रतिनिधी आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यारीता कुठलाही निधी कमी पडू देणार नाही तसेच स्त्री रुग्णालयाच्या माध्यमातून सुध्दा त्वरीत सेवा प्रदान करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सामान्य रुग्णालयात आयोजित महाआरोग्य आणि महारक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, गणेश ईखार, अजय गौळकर, संदिप इंगळे आदी उपस्थित होते. रुग्णालयाला लागणारी विविध उपकरणे व अनुषंगिक बाबी उपलब्ध करुण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून महाआरोग्य शिबिराचे नियोजन व आयोजन उत्तमरित्या केल्याबाबत यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी रुग्णालयाचे आभार मानले. यावेळी डॉ. सचिन तडस यांनी जागरुक पालक, सुदृढ बालक मोहिम, महाआरोग्य शिबिर, महारक्तदान शिबिर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या मोहिमेची माहिती प्रास्ताविकातून दिली. शिबिरामध्ये हृदयरोग, बालरोग, कर्करोग, मॅमोग्राफी, गर्भाशयाच्या मुखाशी होणारा कर्करोगाची तपासणी, स्त्रीरोग, अस्थिरोग, नाक कान घसा, मानसिक रुग्ण, नेत्र रोग, दंतरोग, मधुमेह, कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, आयुष आदी तज्ञ सेवा प्रदान करण्यात आल्या. शिबिरामध्ये जनजागृती करीता आणि कार्यक्रमाची माहिती सर्व सामान्य नागरिकांना देण्याकरीता जागतिक तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कार्यक्रम, मानसिक आरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम, अर्श कार्यक्रम, मलेरिया फायलेरिया, टीबी, आयुष, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आहार विषयक सल्ला इत्यादी विभागांची प्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आलीआचार्य विनोबा भावे ग्रामिण ग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सावंगी मेघे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या. शिबिरामध्ये १ हजार ५३७ रुग्णांनी लाभ घेतला, असे, सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले.