महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती माफीयांवर कारवाई करा

हिंगणघाट/प्रतिनिधी गौण खनिज चोरी प्रकरणी कारवाई दरम्यान हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार ९ रोजी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी कारवाई दरम्यान गौणखनीज पथकाला सशस्त्र पोलिस संरक्षणाची मागणीसुद्धा करण्यात आली. शहालंगडी परिसरातील वणा नदीतील डंकीनजवळ १ रोजी नायब तहसीलदार विजय पवार तलाठी अंबादे व केंद्रे यांना रेतीचोरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करीत गेले असता रेतीघाटात ५ ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारा रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळले, नियमानुसार कायदेशीर कार्यवाही सुरू असता सदर ट्रॅक्टरचे चालक-मालक तसेच कामावर असलेल्या मजुरांनी गोटमार केली. नायब तहसीलदार विजय पवार व तलाठी केंद्रे, अंबादे यांना जिव वाचविण्यासाठी रेतीघाटातुन पळावे लागले होते. वरिष्ठ अधिकारी सोबत असताना अशा घटना घडत असेल तर सामान्य तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कोतवाल हे वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे कोणतेही संरक्षण नसताना क्वचितप्रसंगी मोटारसायकलने अशा प्रकारच्या कारवाया करतात, तेव्हा त्यांचे सोबत काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी. यापुर्वी जिल्हात अनेक कर्मचार्यांवर अशाप्रकारचे हल्ले झालेले आहेत व संबंधित आरोपीवर कठोर कारवाई न झाल्याने रेतीमाफीयाचे मनोबल वाढलेले आहे तर तलाठी संर्वगात भीती व दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्याचा विदर्भ पटवारी संघाचे शाखेने प्रशासनाचा निषेध करीत असुन आरोपीवर कठोर कारवाईची सुद्धा मागणी केली. यावेळी हिंगणघाट उपविभागातील तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.