कारंजात नेत्याच्या घरी क्रिकेट जुगार

कारंजा/प्रतिनिधी शहरात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांवर गुन्हा दाखल केला असून एका जणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शहरातील प्रभाग १६ मधील काँग्रेस पक्षाच्या नेतेच्या घरी १ रोजी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी २ रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित पेटकर हा भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट २०-२० सामन्यावर जुगार घरी चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता अभिजित पेटकर हा अहमदाबाद क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या सामन्यावर आठ आरोपी क्रिकेट जुगार मोबाईलवर खेळत असल्याचे निष्पन्न झाले.

यात मुख्य बुकी संजय उदापुरकर रा. परतवाडा यांच्यासह योगेश इंगोले, धरमसिंग बावरी, माही विजय पिपला, रितू परवानी, निकेश चावके, रिंर्केश तेलहानी, राहुल भांगे, मिथुन बावरी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अभिजित अरुण पेटकर याला अटक करण्यात आली आहे. पेटकरकडून लॅपटॉप, मास्टर मशीन फोन रिसिव्हर, रेकॉर्डर, एक्स्टन्शन बॉक्स, हेडफोन, विविध कंपनीचे मोबाईल,काळ्या रंगाचे ११ मोबाईल असा १ लाख ३६ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत, उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे ,श्रीकांत खडसे, मनीष कांबळे, निरंजन वरभे, रणजित काकडे, अनुप कावळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.