अमरावतीच्या निकालासाठी लागले ३० तास; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती/प्रतिनिधी विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मविआ समर्थीत उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. सलग दोन वेळा या मतदारसंघात निवडून आलेले भाजपाचे डॉ. रणजीत पाटील यांचा त्यांनी ३३८२ मतांनी पराभव केला. मतमोजणीची प्रक्रिया तब्बल तीस तास चालली, हे विशेष. दुसर्या पसंती क्रमांकच्या मतमोजणीनंतर लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते पडली तर डॉ. रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर धीरज लंगडे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून अमरावती शहरातील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण १ लाख २ हजार ५८७ मतांपैकी ८७३५ मते अवैध निघाली तर ९३८२५ मते ही वैध ठरली. पहिल्या फेरीतच धीरज लिंगाडे यांनी ८७७ मतांची आघाडी घेतली होती. यानंतर सलग चारही फेरीमध्ये धीरज लिंगाडे आघाडीवर होते.

पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० मते मिळाली तर डॉ. रणजीत पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली. ८ हजार ७३५ अवैध मतांवर भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अवैध मतांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. रात्री १ वाजताच्या सुमारास अवैध मतांची पडताळणी झाल्यावर धीरज लिंगाडे यांना ३३ मतांचा फायदा झाला. त्यानंतर ४६ हजार ९२७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

रात्री २ वाजतानंतर दुसर्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीत क्रमात सर्वात कमी १२ मते मिळालेल्या निलेश पवार यांना मिळालेल्या दुसर्या क्रमांकाच्या मतांच्या मोजणी पासून सुरुवात झाली. या बाद फेरीत एकूण २३ उमेदवारांपैकी २१ उमेदवार बाद होईपर्यंत मतमोजणी सुरू होती. लिंगाडे यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. अमरावती शहरासह अकोला आणि बुलढाणा येथे देखील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.