जिल्हा ग्रंथालयात दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

वर्धा/प्रतिनिधी मराठी ही अतिशय प्राचिन आणि समृध्द अशी भाषा आहे. या भाषेचे संवर्धन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाने भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा सूर जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजित दुर्मिळ पुस्तकाच्या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला. दरवर्षी दि.१४ ते २८ जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा ग्रंथालयात दुर्मिळ मराठी ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, प्रा.शेख हाशम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, डॉ. उमाजी महाले, नवनित देशमुख, सुधीर गवळी आदी उपस्थित होते. भाषा ही अनेक शब्दांनी समृध्द होत असते. उत्कृष्ट संवादासाठी शब्द हे फार महत्वाचे असतात. मात्र मराठीतून अनेक शब्द लुप्त होत चालले असून त्यांच्या जागी इंग्रजी व हिंदी शब्दांचा वापर केला जात आहे. हे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योग्य नाही.

प्रत्येकाने केवळ मराठी पारंपारीक शब्दाचा अधिकाअधिक वापर केल्यानेच पुढच्या पिढीपर्यंत भाषा अधिकाअधिक समृध्द होत जाईल, असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात लावण्यात आलेल्या या तीन दिवशीय प्रदर्शनात दुर्मिळ मराठी ग्रंथ ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनी दि.२३ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. रसिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरूवातीस फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी केली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. मडावी यांनी केले. यावेळी वाचक, साहित्य रसिकांसह ग्रंथालयातील स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते.