“धनुष्यबाण’ चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम!

नवी दिल्ली/प्रतिनिधी शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन आणि इतर तांत्रिक गोष्टी तपासून शिवसेनेचं चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे कोणत्या गटाकडे जाणार हे अद्याप अधांतरीच राहिलं आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत आपली वेगळी चूल मांडली. यामुळं विधानसभेत संख्याबळ कमी झाल्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. यामुळं शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. पण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी या दोन्ही गटांमध्ये चिन्हावरुन संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर निवडणूक आयोगानं या दोन्ही गटांसाठी तात्पुरती चिन्हं बहाल केली तसेच दोन्ही गटांना वेगळी नावंही दिली. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाचं नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि चिन्ह ‘मशाल’ देण्यात आलं. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलावर’ हे चिन्ह देण्यात आलं.