२०२४ च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे “कॅप्टन’

नवी दिल्ली/प्रतिनिधी जेपी नड्डा हे आणखी एक वर्ष भाजपचे अध्यक्ष असणार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना या पदासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याबद्दलचा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवला जात होता. पण आता मात्र पक्षानेही त्यांच्या नावालाच आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ, एक मोठी गोष्ट अशी की जेपी नड्डा हेच २०२४ पर्यंत भाजपाचे नेतृत्व करणार आहेत आणि लोकसभा निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, हा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत मांडला होता आणि तो भाजपच्या कार्यकारिणीने स्वीकारला होता. ते म्हणाले, आपल्या घटनेनुसार संघटना निवडली जाते. हे वर्ष सभासदत्वाचे वर्ष आहे. कोविडमुळे सभासदत्वाचे काम वेळेवर होऊ शकले नाही, त्यामुळे घटनेनुसार कामाचा विस्तार करण्यात आला आहे. अशा स्थितीत राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला, एकमताने पाठिंबा मिळाला. आता नड्डा जून २०२४ पर्यंत अध्यक्ष राहतील. ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना बिहारमध्ये आमचा स्ट्राइक रेट सर्वाधिक होता, महाराष्ट्रातही बहुमत मिळाले. बंगालमध्ये आमची संख्या वाढली. गुजरातमध्ये आम्ही दणदणीत विजय मिळवला.

ईशान्य भागातही काम केले. जेपी नड्डा यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीने पार पडतील यावर अमित शहा यांनी भर दिला. २०१९ पेक्षा जास्त जागा जिंकल्या जातील. जेपी नड्डा यांनी अमित शाह यांच्याकडून पक्षाची कमान हाती घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पक्षाने प्रचंड बहुमताने पुनरागमन केले तेव्हा अमित शहा यांना केंद्राच्या राजकारणात आणण्यात आले. त्यांना गृहमंत्री करण्यात आले. त्याचवेळी जेपी नड्डा यांना पक्षाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेपी नड्डा हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. अनेक वेळी एकत्रितपणे त्यांनी पक्षाचे अनेक कार्यक्रम पुढे नेण्याचे काम केले आहे. अशा स्थितीत त्या उत्तम समन्वयाच्या दृष्टीने भाजपा २०२४ ची लढाईही जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सज्ज्ा झाली आहे.