रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी भाजपाचे आंदोलन

पुलगाव/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या पुलगाव ते नाचणगाव मध्य वस्तीतील सिमेंट मार्गाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी, यासाठी सोमवार १६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कंत्राटदारा विरोधात भाजपाने ठिय्या आंदोलन केले. ना. नितीन गडकरी यांनी सीआरएफ मधून पुलगाव शहरातील बाजारातून जाणार्या रस्त्याला सिमेंटीकरण करून त्याचे सुशोभिकरण करण्याकरिता १८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. सदर काम नागपूर येथील सिब्बल ॲण्ड सिब्बल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. सदर काम १८ महिन्यात पूर्ण करण्याची अट सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा द्वारा घालण्यात आली. परंतु, मागील एक वर्षापासून कामाची गती अत्यंत संथ असून अजून रस्त्याच्या एका बाजूचेही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दररोज येथे लहानमोठे अपघात होतात. हा ये-जा करण्याचा प्रमुख रस्ता असल्याने संथगतीने सुरू असलेल्या कामाचा फटका नागरिकांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत आहे.

नागरिकांचा त्रास लक्षात घेता भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा व संबंधित ठेकेदाराविरोधात आंदोलनाची भूमिका घेत कार्यकर्त्यांसह राजेश बकाने यांनी खड्ड्यात बसून धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बूब व उपअभियंता मुत्तेलवार यांनी त्वरित आंदोलनस्थळी जाऊन उद्यापासून या रस्त्याचे काम पूर्ण गतीने सुरू करू, असे ओशासन आंदोलनकर्त्यांना दिले. रस्त्यातील एका बाजूचे काम मार्चपर्यंत व दुसर्या बाजूचा रस्ता सुशोभिकरनासह निर्धारित वेळेत ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्याचे ओशासन दिले. तसेच विद्युत खांब हलविण्याचे कार्यारंभ आदेशही दिले. या बैठकीत साबां विभागाचे मुख्य अभियंता बूब, उपअभियंता मुत्तेलवार, नप मुख्याधिकारी राजेश भगत, ठाणेदार शैलेंद्र शेळके आदींची उपस्थिती होती. या आंदोलनात पुलगाव भाजपाचे अध्यक्ष नितीन बडगे, राजीव बत्रा, आशिष गांधी, राहुल चोपडा, किशोर गव्हाळकर, प्रवीण सावरकर, अरविंद नागतोडे, राजू पंपालिया, संतोष तिवारी, रत्नेश दुबे आदींची उपस्थिती होती.