एनआयटी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर शिंदेचे प्रत्युत्तर

नागपूर/प्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसी नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या २ कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला. यावेळी विरोधकांनी शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत सभात्याग केला.

विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपुरातील एनआयटीची जमीन बिल्डरांना कवडीमोल दरात देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. एकनाथ शिंदे यांनी तब्बल ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या २ कोटी रुपयांना दिल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नाही. एकनाथ शिंदे तुमच्यासारखे साडे तीनशे कोटी फुकट देत नाही. नगरविकास मंत्री असताना हे झालं, नव्याने वाटप केले नाही. एकनाथ शिंदे कधीही खोटं काम करणार नाही. ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.