अकरा शासकीय रुग्णालयांत “कफ सिरप’चा दुष्काळ!

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील तब्बल अकरा शासकीय रुग्णालयांत मागील साडेतीन वर्षांपासून ‘कफ सिरप’चा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोकल्याच्या औषधाच्या पुरवठ्याकडे संबंधित दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असले तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस उंटावरून शेळ्या हाकलत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालये येतात; पण मागील साडेतीन वर्षांपासून जिल्ह्याच्या स्थळी असलेल्या औषध भांडाराला वारंवार मागणी करून कफ सिरपचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालयात सध्याच्या स्थितीत कफ सिरपचा दुष्काळच निर्माण झाला आहे. कफ सिरपच्या दुष्काळामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर विेशास ठेवून आरोग्य सेवा घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजूंना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी, या प्रकरणी आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.