ठाकरेंची “मशाल’ धगधगली, लटकेंनी अंधेरीचा “गड’ राखला, “नोटा’ दुसऱ्या स्थानी

मंुबई/प्रतिनिधी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके ५३४७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली आहे, आजवर कोणत्याही पोटनिवडणुकीची झाली नव्हती तेवढी चर्चा अंधेरी पूर्व विधानसभेची झाली. सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची सकाळी मतमोजणी सुरु झाली सर्व फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. ६६ हजार २४७ मतं मिळाली आहेत. त्यांच्यानंतर मिळालेली सर्वाधिक मतं कुणा उमेदवाराला नव्हे, तर नोटाला मिळाली आहेत. सर्व फेरीनंतर नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात पोहोचला आहे. नोटाला १२७७६ मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना १५०६ मतं मिळाली आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास १ लाख ४७ हजार ११७ मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मतं होती. लटके म्हणाल्या, हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या पुण्याईवर मतदारांनी मतदान केले.

मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मते दिली असल्याचे लटके यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान ३ नोव्हेंबरला पार पडलं. या निवडणुकीत दिवंगत लटके यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात अपक्ष उमेदवार रिंर्गणात होते. राज ठाकरे आणि शरद पवारांच्या विनंतीनंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर या निवडणुकीची चर्चा थंडावली मात्र ३ नोव्हेंबरला मतदान झालं त्यावेळी केवळ ३१.७४ टक्के मतदान झालं. ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात असतानाच या निवडणुकीत मतदानाच्या आधी पडद्यामागून ‘नोटा’ ला मत टाका असा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोप केला होता.