चला जाणुया नदीला अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वर्धा/प्रतिनिधी चला जाणुया नदीला या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नदी प्रहरी सदस्यांना अभियानात समाविष्ठ करण्यात आलेल्या धाम, वेणा व यशोदा नदी व नदी काठावरील गावातील कृती आराखड्याची माहिती तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणुन नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सर्व सदस्यांना सूचना दिल्या.

बैठकीला उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कल्पना गोडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मनोज वाहाने, वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, जलसंधारण अधिकारी प्रमोद कळंबे, शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवने, सर्व गटविकास अधिकारी, अभियानासाठी नियुक्ती करण्यात आलेले समन्वयक, धाम नदी प्रहरी सदस्य मुरलीधरश बेलखोडे, माधव कोटस्थाने, वना नदी नदी प्रहरी सदस्य व यशोदा नदी प्रहरी सदस्य राजु पवार, सुनिल राहाणे आदी उपस्थित होते. चला जाणुया नदीला अभियानाबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, राज्यातील ७५ नद्यांची या अभियानात निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील ३ नद्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

या संदर्भात नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आज नदींची बदलत असलेली परिस्थिती बाबत अभियानाचे महत्व सांगितले. गावांच्या नागरी क्षेत्राची कुंटूंब संख्या, लोकसंख्या, पाणी टंचाई, टँकरने पाणी पुरवठा असलेली गावे, बीएमसी स्थापित झालेल्या ग्रामपंचायती, मल व जल निःस्सारणाची माहिती संबंधित गटविकास अधिका-यांनी तात्काळ समन्वकांना सादर करावी. पूर प्रवणक्षेत्रातील गावे, खा-या आणि गोड्या पाण्याच्या समस्या असलेली गावे व पाझर तलाव साठवण तलावाची माहिती जलसंपदा विभागांनी तर वनक्षेत्रात असलेल्या गावांची माहिती वन विभाग व नदीच्या प्रदुषणाचा मागील तीन वर्षाचा अहवाल प्रदुषण मंडळाने सादर करावा. त्याचबरोबर एकुण लागवडीखालील क्षेत्र, भुजल अहवाल, पाणलोट निहाय नदींचे नकाशे आदी माहिती तात्काळ समन्वयकांना व जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बैठकीत संबंधित विभागांना दिल्या. बैठकीला सर्व समितीचे सदस्य अशासकीय सदस्य उपस्थित होते.