उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्रीविठ्ठलाची महापूजा

पंढरपूर/प्रतिनिधी कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला, हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ. कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापुजा केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. महापुजेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

भाविकांना रांगेत जास्त वेळ लागणार नाही, भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याचा विचार आम्ही आराखडा तयार करताना करत आहोत. त्या पद्धतीने कामे करण्यात येतील. तिरुपतीला गर्दी काळात पण दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागतेच. यामुळे भाविकांना जो पॅटर्न सोयीचा आहे, तो पॅटर्न आम्ही पंढरपूरला राबवू. फडणवीस म्हणाले, जवळपास दोन हजार कोटींचा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. नवीन सोईसुविधांमुळे वारकऱ्यांच्या पंरपरेला बाधा होईल, असे कोणतेही काम करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच, तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम करताना मंदिर परिसरात काही ठिकाणी भू संपादन करावे लागेल. ते करत असताना बाधित लोकांचे योग्य रितीने पुनर्वसन करण्यात येईल. कोणीही विस्थापीत होणार नाही याची दक्षता घेऊ. मात्र, ज्यांच्या जागा घेऊ, त्यांना योग्य मोबदला, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याच येईल.