शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार?

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज (१ नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं आहे. त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली असून, २९ नोव्हेंबरला याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनवणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. असीम सरोदे यांनीही सर्वो च्च न्यायालयात मतदारांच्यावतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केली असून, त्यांचं मतं ऐकून घेतलं आहे.

यानंतर असीम सरोदे यांनी न्यायालयाच्या सुनावणीवर भाष्य केलं आहे. असीम सरोदे म्हणाले, ठाकरे गट आणि शिंदे गटाने लेखी युक्तीवाद दाखल करायला हवे, असं न्यायालयाचे मतं होतं. त्यानुसार दोन्ही पक्षकारांनी ४ आठवड्यांचा वेळ मागितला असून, २९ नोव्हेंबरपर्यंत मत सादर करण्यात येईल. २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होईल, अशा स्वरूपात न्यायालयाने मत व्यक्त केलं आहे. पण, त्याची शक्यता धूसर आहे. कारण, अरुणाचल प्रदेशच्या प्रकरणात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. तो ओलांडून पुढचा विचार करायचा असेल तर, सात न्यायाधिशांच्या खंडपीठाची आवश्यकता आहे. तशी मागणीही केली जाऊ शकते. तसे झाले तर घनापीठांचे पुनर्गंठन होत पुन्हा सुनावणी सुरु होणार. त्यामुळे सुनावणी लांबणीवर जाऊ शकते.

परंतु, डिसेंबरपूर्वी अंतिम निकाल लागेल, असा विेशास असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निकाल लागेल का? यावरही सरोदे यांनी मत व्यक्त केलं आहे. निवडणुकीपूर्वी निकाल लागला पाहिजे. कारण, शिवसेना कोणाची हा तात्पुरता आदेश देण्यात आला आहे. यावरती निवडणुका पार पडणे लोकशाहीच्या हिताचे नाही. त्यामुळे लोकशाहीचं आरोग्य टिकवण्यासाठी लवकरात लवकर निर्णय होऊन स्पष्टता आली तर, मतदार आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असं असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.