दिवाळी संपली; शिध्याचा आनंद निम्म्यांनाचा!

सिंदी (रे.)/प्रतिनिधी येथील अर्धा डझन स्वस्त धान्य दुकानातून राज्य सरकारने देऊ केलेल्या आनंदाचा शिध्याचे वाटप करण्यात आले. पण, दिवाळीच्या काळातच निम्मे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे. गोरगरीब जनतेला चार घास गोड मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने आनंदाचा शिधा उपक्रमातून रवा, तेल, साखर आणि चणाडाळ प्रत्येकाला एक किलो देण्याचे जाहीर केले. त्यासाठी केवळ १०० रुपये आकारण्यात आले आहे. परंतु, सरकारी काम अन थोड थांब, या उक्तीप्रमाणे त्या साहित्यांचे वाटप विहित मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. २२ रोजी दुपारी प्राप्त साहित्य संपले होते. परिणामी अनेक लाभार्थी दुकानातून हात हलवत परतले. दिवाळी संपली शिधा मिळेल की, मिळणारच नाही, याचा खुलासा कोणताही अधिकारी करीत नाही, हे येथे उल्लेखनीय! योजनेची सुरुवात मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली होती. अनेकांनी फोटो काढून शासनाचे खंदे समर्थक असल्याचा दावा केला. मात्र आता तिच मंडळी गप्प बसून आहे. या वितरण प्रणालीचा आढावा घेतल्यानंतर तेलासाठी वाटप प्रक्रिया थांबली आहे, असे सेलूचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. १ तारखेपासून उर्वरित लाभार्थ्यांना साहित्य मिळावे असे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.