जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा

वर्धा/प्रतिनिधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील २ हजार ५४१ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे हस्ते ऑनलाईन जमा करण्यात आली. प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येते झाला. त्याचे थेट प्रसारण जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश भजनी व शेतकरी उपस्थित होते. गेल्या अडीच वर्षापूर्वी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली होती.

या योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. आज योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रोत्साहन लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मुंबई येथून करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करुन विहित कालावधीत नियमित परतफेड केलेल्या आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकुण १३ हजार ४९३ शेतकऱ्यांचे खाती अपलोड करण्यात आले असून ३ हजार १९८ कर्जखाती विशिष्ट क्रमांकासहीत पहिल्या टप्यात प्राप्त झाले. यापैकी २ हजार ५४१ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयाची रक्कम थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वळती करण्यात आली.