पुलगावात “चेन स्नॅचिंग’; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान

वर्धा/प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात सध्या एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत आहे. तीन दिवसांपूर्वी वर्धा शहरातील धुनिवाले मठ परिसरात चेन स्नॅचिंगची घटना घडली. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच २ रोजी पुलगाव येथील हरिराम नगर परिसरात रात्री ९.१५ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने मात्र महिलावर्गांत दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात सध्या सोनसाखळी चोरट्यांनी हैदोस घातला आहे. पोलिसांकडून अनेकदा मौल्यवान दागिने परिधान करुन घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांचे याला पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने अशा घटना घडताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना पुलगाव शहरात घडली. राखी मंडले ही महिला घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी रस्ता सामसुम असल्याचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार राखी मंडले यांनी पुलगाव पोलिसात दिली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली