नवरात्रोत्सव शातंतेत पार पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्गा मंडळाना आवाहन

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुर्गादेवी मंडळाना पोलिस विभागाकडून दिलेल्या परवानगी नुसार नियमाचे पालन करत नवरात्रोत्सव शांततेत पार पाडावा तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी दुर्गादेवी मंडळांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत सोळके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार, दुर्गादेवी मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवरात्र उत्सवादरम्यान गर्दी होणाऱ्या ठिकाणी तसेच मुख्य चौकामध्ये आवश्यक त्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. तसेच रात्रीच्या सुमारास देखील पोलिस गस्त वाढविण्यात आला आहे. उत्सवाच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस विभागासह मंडळांनी सहकार्य करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या. यावेळी गणेश मंडळाच्या परवाणगीच्या तुलनेत दुर्गादेवी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाची संख्या तिप्पट असून जिल्हयात ९८५ दुर्गादेवी मंडळ व ३८ शारदादेवी उत्सवासाठी परवाणगी देण्यात आलेली आहे. दुर्गादेवी विर्सजन करण्यासाठी नेण्यात येणारे मार्ग नेमुन देण्यात आले आहे. मंडळांना दिलेल्या सूचनाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी केले आहे. बैठकीला शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.